नाशिक : गत वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीने उडवलेली दाणादाण व यंदाही पावसाने फिरविलेली पाठ यातून जिल्ह्णात शेतकरी आत्महत्त्येच्या घटनेत कमालीची वाढ झाली असून, गेल्या नऊ महिन्यांत ५४ शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्त्या केल्या असल्या तरी, त्यातील ३५ शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याने त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात आली आहे. शनिवारी शेतकरी आत्महत्त्या प्रकरणी मदत करणाऱ्या समितीची बैठक घेण्यात आली, त्यात आजवर शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्त्यांच्या प्रकरणांची चर्चा होऊन सात आत्महत्त्येच्या प्रकरणांची चर्चा करण्यात आली. त्यात तीन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या केल्याचा अहवाल पोलीस व कृषी खात्याने सादर केला असल्याने त्यांना मंजुरी देण्यात आली. तीन प्रकरणे नाकारून एक प्रकरण फेर चौकशीसाठी पाठविण्याचे ठरविण्यात आले. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्णात ५४ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यात काहींनी विहिरीत उडी घेऊन, तर काहींनी विषारी औषध सेवन करून तसेच रेल्वेखाली उडीही घेण्यात आलेली आहे. आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्याची खातरजमा केली असता फक्त ३५ शेतकरीच खऱ्या अर्थाने कर्जबाजारी होते व त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्त्या केल्याचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असल्याने मृत शेतकऱ्यांच्या एका वारसाला एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. तर अन्य शेतकऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्त्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना मदत नाकारण्यात आली आहे. सर्वाधिक आत्महत्त्या
नऊ महिन्यांत जिल्ह्णात आत्महत्त्या केलेल्या; परंतु शासकीय मदतीस पात्र ठरलेल्या ३५ शेतकऱ्यांपैकी एकट्या मालेगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्या खालोखाल बागलाण (९), नांदगाव व निफाड प्रत्येकी पाच, सिन्नर (२), चांदवड (३), येवला, दिंडोरी, इगतपुरी व कळवण या चार तालुक्यांत प्रत्येकी एक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या केली आहे.