नाशिक : ठेवीदारांनी अल्पबचत प्रतिनिधींकडे विश्वासाने जमा केलेली दैनंदिन पूर्ण रक्कम खात्यावर जमा न करता सुमारे ३५ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या आडगाव येथील सर्वज्ञ श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक व अल्पबचत प्रतिनिधी अशा सुमारे १९ जणांवर आडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ लासलगाव सहकारी संस्था लेखा परीक्षक संजय लोळगे यांनी ही फिर्याद दिली आहे़
आडगाव परिसरातील पतसंस्थेत घडलेल्या या प्रकारामुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ लोळगे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आडगावात सर्वज्ञ श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था असून, या पतसंस्थेत १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ या वित्तीय वर्षभराच्या कालावधीत व्यवस्थापक, लिपिक, अल्पबचत प्रतिनिधी व संचालक असलेले संशयित राजू लभडे, संजय माळोदे, सुरेश माळोदे, अविनाश माळोदे, जावेद सय्यद, प्रवीण देशमुख, महेश अपसुंदे, अनिल जगताप, पुंजाराम दुशिंग, सुरेश हांडोरे, पोपट माळोदे, भाईपुंजा माळोदे, दिक्षीराम जाधव, भाऊसाहेब शिंदे, नारायण लोहकरे, सुदाम लभडे, निर्मला शिंदे, अलका माळोदे, निर्मला रहाटळ यांनी संगनमत करून ठेवीदारांकडून जमा केलेली रक्कम पूर्णपणे त्यांच्या खात्यावर जमा केली नव्हती.
याबाबत पतसंस्थेचे ठेवीदार मोतीराम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीनंतर पतसंस्थेच्या करण्यात आलेल्या फेर लेखापरीक्षणात या संशयितांनी वित्तीय वर्षाच्या कालावधीत सुमारे ३५ लाख रुपयांचा अपहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले़ या प्रकरणी संशयितांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३ नुसार गुन्हा करण्यात आला आहे.