नाशिक : आर्थिक वर्षाअखेर शासकीय कार्यालयांचे देणे व अनुदान वाटपाची शुक्रवारअखेर सुमारे दोन हजार देयके जिल्हा लेखाकोष कार्यालयात जमा झाली असून, त्यापोटी ३५० कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा कोषागार कार्यालयाने सुमारे पाचशे कोटी रुपयांची देयके अदा केली आहेत. शनिवारी आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत कार्यालयाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे यांनी सांगितले. दरवर्षाप्रमाणे यंदाही शासनाचे अर्थसंकल्पीय अनुदान वर्षाच्या अखेरच्या दिवशी विविध विभागांकडून अदा करण्यात येते. त्यात शासकीय योजना व अनुदानाचा तसेच कामांच्या देयकांचा संबंध असतो. त्याचप्रमाणे शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय देयके, प्रवास बिले, कार्यालयीन खर्चदेखील आर्थिक वर्षाअखेर अदा केला जात असल्याने कोषागार कार्यालयाच्या कामकाजावर मार्च महिन्यात ताण पडतो. आर्थिक वर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्हा कोषागार कार्यालयाकडे २००० देयके सादर करण्यात आली असून, त्यापोटी ३५० कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. शनिवारी (दि. ३१) जिल्हा लेखाकोषागार व उपकोषागार कार्यालये सुरू राहणार असून, जिल्हा कार्यालय रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.५०० कोटी रुपये अदायंदा शासनाने सर्वच खात्यांना पत्र पाठवून कार्यालयीन देयके २३ मार्चपर्यंत सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयात २० मार्चपासून साधारणत: दररोज एक हजार देयके सादर केली जात होती. आलेल्या देयकांची तपासणी व शासनाने केलेली आर्थिक तरतूद तपासून तत्काळ देयके अदा करण्यास सुरुवात करण्यात आली असून, शुक्रवारपर्यंत जवळपास ५०० कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत,
कोषागार कार्यालयात ३५० कोटींची देयके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 1:42 AM