कळवण : येथील उपजिल्हा रुग्णालयातील व तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ३५० कोरोना लस उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले.
पहिल्या टप्प्यात कळवण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागातील शंभर जणांना लसींचा डोस दिला जाणार असून, दुपारी ३ वाजेपर्यंत ६० जणांना लस देण्यात आली होती. या ठिकाणी पहिली लस उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांना देण्यात आली. कळवण तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या लसींचा साठा कळवण उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आला आहे .कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परदेशी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन कोरोना लसीकरण मोहिमेची पाहणी करून माहिती घेतली. कळवण उपजिल्हा रुग्णालयातील १०० जणांना ही लस दिली जाणार आहे .कोरोनाविरुद्धच्या लढाईत अहोरात्र योगदान देणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, शिपाई व इतर कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. कोरोनाप्रतिबंधक लस कळवण उपजिल्हा रुग्णालयात येऊन पोहोचली, याचा आनंद आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लस उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले.-डॉ. प्रल्हाद चव्हाणवैद्यकीय अधिकारी