नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे दुकाने, मंदिरांच्या वेळा, सार्वजनिक सोहळे, लग्न समारंभ, आठवडे बाजार यांवर निर्बंध घातले गेले आहेत. बुधवारपासून (दि. ९) या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्च महिन्याचा आठवडा पूर्ण झाला असून, रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने हालचाल करत कार्यवाहीला सुरुवात केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिकरित्या गर्दीत अनावश्यकपणे मिसळणे टाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर आणि सामाजिक अंतर राखण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शहरात मंगळवारी दिवसभरात ४, तर मालेगावात २ आणि ग्रामीण भागातील ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा मृत्यूचा आकडा २ हजार १४९ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ लाख २७ हजार १०७वर पोहोचली असून, १ लाख २० हजार ५६२ रुग्णांनी आतापर्यंत काेरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. नाशिक शहरात ३ हजार ३५० रुग्ण, तर मालेगावात ४१३ आणि ग्रामीण भागात ५९४ असे एकूण ४ हजार ३९६ रुग्ण उपचारार्थ वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. २ हजार ३१४ चाचण्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
नाशकात ३५८ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:16 AM