सिन्नर : सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या (स्टाईस) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तीन पॅनलमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
स्टाईच्या निवडणुकीत ५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात १७ जणांनी माघार घेतल्याने १२ जागांसाठी ३६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक अविनाश पोटे, सुधा माळोदे-गडाख, पंडित लोंढे यांच्या नेतृत्वाखाली उद्योजक विकास पॅनल, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांचा नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली सहकार उद्योग विकास आघाडी पॅनल, तर माजी अध्यक्ष दिलीप शिंदे व किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्टाईस बचाव पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. तीन पॅनलमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी १७ जुलै रोजी मतदान होणार आहे. ३४० सभासद असलेल्या संस्थेत कारखानदार प्रतिनिधी ७, महिला प्रतिनिधी २, इतर मागास वर्ग, अनुसूचित-जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती व जमाती यांचे प्रत्येकी एक संचालक निवडणूक द्यायचे आहेत.
चौकट-
माघारीनंतर रिंगणातील उमेदवार
कारखानदार गट-नामकर्ण आवारे, अरुण चव्हाणके, सुनील कुंदे, श्रीहरी नावंदर, कैलास हांडोरे, महेंद्र क्षत्रिय, अविनाश तांबे, चंद्रभान हासे, बाबासाहेब दळवी, सुनील जोंधळे, प्रमोद महाजन, कैलास वाघचौरे, अतुल अग्रवाल, माधव घोटेकर, किशोर देशमुख, संजय शिंदे, विजय सपकाळ, अविनाश डोखळे, सुधीर साळवेकर, दिलीप शिंदे, चंद्रशेखर गुंजाळ. अनुसूचित जाती / जमाती गट-मधुकर जगताप, संदीप पगारे, सुधीर वाघचौरे. भटक्या विमुक्त जाती / जमाती गट-रामदास दराडे, रामदास डापसे, करणसिंग पाटील. इतर मागास प्रवर्ग गट-प्रभाकर बडगुजर, पंडित लोंढे, सूरज देशमुख. महिला प्रतिनिधी-सिंधू आवारे, सुनंदा मुटकुळे, अलका जपे, सुधा माळोदे, विजया पगार, मीरा डावखर.