सिन्नर : झाडांमुळे सावली पडते आणि हीच सावली सौरऊर्जा प्रकल्पासाठी नको असते म्हणून तालुक्यातील वावी येथील वीज वितरण कंपनीच्या प्रांगणातील एक दोन नव्हे, तर तब्बल ३६ झाडांवर कुºहाड चालविण्यात आली आहे.वावी येथे साकारत असलेला सौरऊर्जा प्रकल्प स्वागतार्ह असला तरी त्यासाठी कत्तल करण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात नवीन झाडे आणि ती केव्हा लावली जाणार आहेत याबाबत कोणताही अधिकारी ठामपणे सांगण्यास पुढे येत नसल्याचे दिसते. वावी गावालगतच पश्चिमेला नांदूरशिंगोटे रस्त्यावर वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. स्वमालकीची भव्य आणि प्रशस्त जागा असल्याने वीज वितरण कंपनीकडून याठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीला पाणी देण्याच्या रब्बीच्या काळात विजेचा तुटवडा निर्माण होत असतो. या पार्श्वभूमीवर कृषी रोहित्रांना वीज पुरविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने सौरऊर्जा प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या नक्कीच हिताचा आहे. त्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथील वीज वितरण कंपनीची सपाट आणि प्रशस्त जागा निवडण्यात आली आहे. सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून, त्यासाठी लागणारे पॅनल प्रकल्पाच्या जागेवर आले आहेत. मैदान सपाटीकरणाचे काम पूर्ण करतानाच या भागात असणारी विविध ३६ झाडे तोडण्यात आली आहेत. या सौरऊर्जा प्रकल्पासाठी सावली नको असते, त्यामुळे ही झाडे तोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्या बदल्यात किती झाडे लावण्यात येणार आहेत आणि केव्हा याबाबत वीज वितरण कंपनीचे अधिकारी ठामपणे काहीही सांगत नाहीत. ‘आम्हाला या प्रकल्पाची माहिती देण्यास परवानगी नाही, तुम्ही वरिष्ठांसोबत बोला’, असे मोघम उत्तर वावीचे सहायक अभियंता अजय सावळे यांनी दिले. वावीचे छोटेसे पर्यटनस्थळच ओसाडवावी गावापासून पश्चिमेला असलेल्या वीज वितरण कंपनीच्या प्रांगणात दत्त मंदिर आहे. याठिकाणी दर्शनासाठी आणि सायंकाळी फिरण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांसह महिला व ग्रामस्थ जात असतात. पायी फिरण्यासाठी जाऊन अनेकजण या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. मुले खेळतात. या मंदिरासमोर छोटासा बगीचा तयार करण्यात आला होता, याशिवाय पाण्याचा कारंजाही होता. याठिकाणी ग्रामस्थ व तत्कालीन कर्मचाºयांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात झाडे होती. कर्मचारी वसाहतही जवळच असल्याने झाडांची काळजी राखली जात होती. मात्र सौरऊर्जा प्रकल्पासाठी या झाडांवर कुºहाड चालविण्यात आल्याने वावीकरांचे छोटेसे पर्यटनस्थळ ओस पडण्याच्या मार्गावर आहे.असा आहे सौरऊर्जा प्रकल्प..सिन्नरच्या पूर्व भागातील वावी येथे सुमारे ६० हजार स्क्वेअर फूट जागेवर सौरऊर्जा प्रकल्प साकारला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त उपक्रमातून सदर प्रकल्प होणार आहे. शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करता यावा हा त्यामागील उद्देश आहे. ५१० किलोवॉट म्हणजे ०.५ मेगावॉट क्षमतेचा सदर सौरऊर्जा प्रकल्प आहे. सी.एल. इंडिया लिमिटेड (सेंट्रल इलेक्ट्रॉनिक इंडिया) कंपनीकडून सदर काम केले जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १६२० पॅनल असणार आहेत. सुमारे दोन ते तीन महिन्यांत या प्रकल्पाचे काम होईल, अशी शक्यता आहे.
सावली नको म्हणून ३६ झाडांवर कुहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:20 AM