नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी (दि. ७) ४०३६ रुग्णांची वाढ झाली, तर ३६०६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ४३ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३७८४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १,८१५, तर नाशिक ग्रामीणला १९७९ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ६८ व जिल्हाबाह्य १७४ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १७, ग्रामीणला २१, मालेगाव मनपा ४, जिल्हाबाह्य १, असा एकूण ४३ जणांचा बळी गेला आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास होती. त्यात गत तीन दिवस काहीशी घट झाली होती. मात्र, बुधवारपासून पुन्हा मृतांच्या आकड्याने चाळिशीवरील वाढ कायम ठेवल्याने आरोग्य यंत्रणेच्या काळजीत भर पडली आहे.
इन्फो
उपचारार्थी ३४ हजारांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांच्या समकक्ष आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३४५५३ वर पोहोचली आहे. त्यात १६ हजार ८०१ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १५ हजार ८६३ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ५६१ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ३२८ रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ८९ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ८९.०६ टक्क्यांवर पाेहाेचली आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९१.३१ टक्के, नाशिक शहर ९१.०६, नाशिक ग्रामीण ८६.१४, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८४.४७ टक्क्यांवर पाेहोचला आहे.