-----
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड येथून ३६९ प्रशिक्षणार्थी नवसैनिकांची तुकडी बुधवारी (दि.७) देशसेवेत दाखल झाली. ४२ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत ‘‘तोपची’’ म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांनी लष्करी थाटात संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्यूट केला.
सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या देशभरातील युवकांना भारतीय सेनेत जाण्यासाठी तोफखाना केंद्र हे उत्तम व्यासपीठ आहे. या केंद्राची स्थापना नाशकात १९४८ साली करण्यात आली. देशातील सर्वांत मोठे तोफखाना प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळख प्राप्त आहे. दरवर्षी शेकडोंच्या संख्येने नवसैनिक तोफा चालविण्याचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण घेत भारतीय सेनेत दाखल होतात. मागील महिन्यात २७१ नावसैनिक देशसेवेत दाखल झाले. बुधवारी येथील उमराव मैदानावर झालेल्या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल पी. आर. मुरली उपस्थित होते. या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यावरसुद्धा कोरोनाचे सावट पहावयास मिळाले. संचलनासाठी मैदानावर उपस्थित नवसैनिकांनी तोंडावर मास्क परिधान करत ‘सोशल डिस्टन्स’चे पालन करत सशस्त्र संचलन केले. मुरली यांनी संचलनाचे निरीक्षण करत नवसैनिकांकडून मानवंदना स्वीकारली. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी नवसैनिक म्हणून गनर सुखजिंदर सिंह यांना स्मृतिचषक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या तोफा मैदानावर आणण्यात आल्या होत्या.
------
इन्फो
--
...यंदा गौरव पदक जवानांकडे सुपूर्द
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तोफखान्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने जवानांच्या विविध गावांमधून येणाऱ्या पालकांना या सोहळ्यासाठी प्रवेशास मनाई करण्यात आली होती. यामुळे जवानांच्या कुटुंबीयांना उपस्थित राहता आले नाही.
मोठ्या सन्मानाने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी यावेळी माता-पित्यांना दिले जाणारे ''गौरव पदक'' यंदा नवसैनिकांकडे सुपूर्द करत त्यांच्या पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
----
सैनिकी धर्म पाळावा
नवसैनिकांनी नेहमीच सैनिकी धर्म बजवावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असे आवाहन मेजर जनरल पी. आर. मुरली यांनी केले.
यावेळी नवसैनिकांचे त्यांनी भारतीय सैन्यदलात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. देशसेवेत आपले चोख योगदान देत नवसैनिकांनी नेहमीच सैनिक धर्म बजावावा आणि तोफखाना केंद्राचा नावलौकिक वाढवावा, असे ते म्हणाले.
-----
फोटो आर:०८आर्मी/०८आर्मी१