नाशिक : सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांकडून सातपूरमधील २५ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपयांना प्लॉट खरेदी करून व्यवहार पूर्ण न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे बजाज फायनान्सकडून ११ कोटी ४७ लाख ४९ हजार ८५० रुपयांचे कर्ज काढून एकूण ३७ कोटी ४६ लाख २४ हजार ८५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बॉटल सम्राट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य संचालक संशयित बद्रीप्रसाद जयस्वाल, मुलगा अभिषेक बद्रीप्रसाद जयस्वाल व पत्नी संतोष बद्रीप्रसाद जयस्वाल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, यातील प्रमुख संशयित बद्रीप्रसाद जयस्वाल यांचा मृत्यू झाला आहे़ सुयोजितचे संचालक अनंत केशव राजेगावकर (रा़ मॉडेल कॉलनी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे सातपूर येथील गट क्रमांक १००/१/२ क, गट नंबर १००/१ + २५ येथे अनुक्रमे मंजूर लेआऊट क्रमांक १७ ते १९ चे १२०० चौरस मीटर आणि ४००० चौरस मीटर क्षेत्र आहे. संशयित बद्रीप्रसाद जयस्वाल याने १३ मे २०१५ रोजी अनंत राजेगावकर यांच्याशी व्यवहार करून २५ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपयांना हा प्लॉट खरेदी केला. या प्लॉटचे खरेदीखत तयार करताना त्यामध्ये खरेदीच्या रकमेसाठी आयसीआयसीआय बँकेचे पुढील तारखेचे धनादेश दिले आहे, असे लिहिलेले होते़ मात्र संशयित जयस्वाल यांनी या प्लॉटचे बनावट दस्तऐवज तयार करून त्यात एचडीएफसी बँकेत पूर्ण भरला केला, असे बनावट दस्त तयार करून त्यावर दुय्यम निबंधक कार्यालयाचा बनावट शिक्का मारला़ यानंतर संशयित जयस्वाल यांनी ही बनावट कागदपत्रे बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीत दाखल करून तेथील अधिकाऱ्यांशी संगनमत करून २६ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या आधारे ११ कोटी ४७ लाख ४९ हजार ८५० रुपयांचे कर्ज मिळावे यासाठी अर्ज केला. बजाज कंपनीने तीन ते चार दिवसांतच कर्ज मंजूर करून रक्कमही अदा केली़ विशेष म्हणजे बजाज फायनान्सकडून कर्ज मंजूर करताना यातील सर्च रिपोर्टदेखील चुकीचा असल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, २०१२ मध्ये बॉटल सम्राट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बद्रीप्रसाद जयस्वाल यांनी सुरू केली होती, मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले असून त्यांचा मुलगा अभिषेक व पत्नी संतोष या कंपनीच्या संचालक असल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित बद्रीप्रसाद यांनी कोट्यवधी रुपयांचा प्लॉटचा व्यवहार करून फसवणूक केल्याची फिर्याद राजेगावकर यांनी दिली आहे़ बद्रीप्रसाद यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कंपनीचे मालक वारसा हक्काने त्यांची मुले व पत्नी असल्याने त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़- व्ही़ ए़ शेळके, सहायक पोलीस निरीक्षक, सरकारवाडा पोलीस ठाणे
सुयोजित संचालकांना ३७ कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:26 AM