नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी २७ उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्यात मनसेच्या विद्यमान नगरसेवक सुरेखा भोसले आणि भाजपाच्या नगरसेवक रंजना भानसी यांच्यासह चार माजी नगरसेवकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण ३७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून, बुधवार (दि. १) रोजी राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या घोषित होणार असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस वेग येणार आहे. राजकीय पक्षांकडून अधिकृतपणे उमेदवारी घोषित न झाल्याने इच्छुकांनी सावध पवित्रा घेतला आहे. पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी घोषित झालेली नसतानाही पाचव्या दिवशी मनसेच्या नगरसेवक व सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांनी पूर्व विभागातील प्रभाग १३ मधून तर पंचवटीतून भाजपाच्या रंजना भानसी यांनी प्रभाग क्रमांक १ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय, पंचवटी विभागातून माजी नगरसेवक अरुण पवार, रुक्मिणी कर्डक, पूर्व विभागातून अनिल ताजनपुरे तर नाशिकरोडमधून लंकाबाई हगवणे या माजी नगरसेवकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय, सातपूरमधून प्रभाग क्रमांक ९ मधून माजी महापौर दशरथ पाटील यांचे सुपुत्र प्रेम पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिवसभरात पंचवटीतून ५, पश्चिममधून ३, पूर्वमधून ६, नाशिकरोडमधून ४, सातपूरमधून ६, सिडकोतून ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आता अवघे तीनच दिवस शिल्लक असून, राजकीय पक्षांकडून अधिकृतपणे उमेदवारी घोषित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त होणार आहे.