नाशिक : महापालिकेने शहरात उद्भवलेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ठिकठिकाणी विंधनविहिरी खोदण्याचे काम सुरू केले असून, आतापर्यंत ३७ विंधनविहिरींना पाणी लागले आहे. सुमारे २०० विंधनविहिरी खोदण्याचे उद्दिष्ट असल्याचे अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले. गंगापूर आणि दारणा या धरणांत घटत चाललेला जलस्त्रोत आणि ३१ जुलैपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान समोर असल्याने महापालिकेने पाणीकपातीबरोबरच पर्यायी विविध उपाययोजनाही राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेमार्फत सहाही विभागात ठिकठिकाणी विंधनविहिरी खोदण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सुमारे २०० विंधनविहिरी खोदण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ३७ विंधनविहिरी खोदण्यात येऊन त्यांना पाणीही लागले आहे. सदर विंधनविहिरींवर हातपंपही बसविण्यात येऊन ते कार्यान्वित केले जात आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून विंधनविहिरींचे प्रस्ताव मान्य होऊन आल्यानंतर खोदण्याचे काम केले जात आहे. साधारणपणे २०० फुटापर्यंतच खोदकाम केले जात असून त्याच्या आतच बऱ्याच ठिकाणी पाणी लागले आहे. विंधनविहिरी घेताना प्रामुख्याने उद्याने, सुलभ शौचालये या लगतची जागा निवडली जात आहे. भविष्यात सदर विंधनविहिरींचा उद्याने, शौचालयांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. काही विंधनविहिरी नगरसेवक निधीतूनही घेण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
37 विंधनविहिरींना लागले पाणी
By admin | Published: May 16, 2016 11:18 PM