नाशिक : गोदावरीसह नासर्डी, वाघाडी व कपिला नदीपात्र व परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत पाच तासांत सुमारे १९ हजार स्वयंसेवकांच्या मदतीने ३७४ मे. टन कचरा काढण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी दिली.हरितकुंभ संकल्पनेअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी सकाळी ७ ते ११ या पाच तासांच्या कालावधीत शहरातील गोदावरी नदीसह नासर्डी, वाघाडी व कपिला पात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील विविध शासकीय-निमशासकीय खात्यातील कर्मचाऱ्यांसह ११२ संस्था सहभागी झाल्या होत्या. मोहिमेत १९ हजार २०० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवत नदीपात्रातील घाण-कचरा बाहेर काढला. या मोहिमेसाठी महापालिकेने घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानुसार ५३ घंटागाड्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या खतप्रकल्पावर ३७४ मे. टन कचरा वाहून नेण्यात आला. या घंटागाड्यांनी त्यासाठी १८७ फेऱ्या केल्या. त्यात गोदावरी नदीपात्रातून सर्वाधिक १७६ टन कचरा काढण्यात आला, तर सुमारे १०० टन कचरा नासर्डीतून बाहेर काढण्यात आला. याशिवाय २० जेसीबी, एक रोबोट, एक पोकलॅन व आठ डंपरचीही व्यवस्था करण्यात आली होती. या मोहिमेमुळे नासर्डी नदीतील कचरा बऱ्याच वर्षांनी हटण्यास मदत झाली. नासर्डी नदीतील कचरा हटविण्यासाठी स्वयंसेवकांना सर्वाधिक कष्ट पडले. नासर्डी नदीची जबाबदारी नाशिक महापालिकेने स्वत: आपल्या शिरावर घेतली होती. (प्रतिनिधी)
मोहिमेत निघाला ३७४ टन कचरा
By admin | Published: June 06, 2015 12:46 AM