नाशिक : ‘था नासिक में बातील अंधेरो का डेरा....’, ‘सादिकशाह हुसेनी जिंदाबाद...,’ ‘मेरा शहंशाहे नासिक ऐसी शानवाला हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस हुसेनी बाबा यांच्यावर आधारित स्तुतीपर काव्यपठण करीत शेकडो मुस्लीम बांधवांनी ‘जुलूस-ए-हुसेनी’मध्ये सहभाग घेतला.निमित्त होते, सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी यांच्या ३८९व्या वार्षिक संदलचे. हुसेनी बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी संदल साजरा केला जातो. बडी दर्गा परिसरात मोठ्या उत्साहात संदलचा धार्मिक कार्यक्रम सोमवारी (दि.२७) पार पडला. यानिमित्त शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीला रात्री पाणवेआठ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी मौलाना महेबुब आलम, सय्यद एजाज काझी, हाजी मीर मुख्तार अशरफी, एजाज रझा, सलीम पटेल आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी खतीब यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
अग्रभागी फूलांनी सजविलेली चादर वाहनात ठेवण्यात आली होती. दारुल उलूम सादिकुल उलूम, गौस-ए-आझमचे विद्यार्थी पांढऱ्या शुभ्र पठाणी कूर्ता या पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. सुन्नी दावत-ए-इस्लामी, बज्मे गरीब नवाज युवक मंडळ, बागवानपुरा युवक मंडळांनीही मिरवणूकीत सहभाग घेतला. सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी हुसेनी बाबा यांच्या जीवनचरित्राविषयी मिरवणूकीत माहिती दिली. मिरवणूक मार्गावरील बहुतांश पथदीप बंद असल्याने व काही जुनाट झाल्याने अंधाराचे साम्राज्यामुळे गैरसोय होऊ नये म्हणून, त्या परिसरातील युवक मंडळांनी ठिकठिकाणी हॅलोजन लावून वाढीव विद्युतव्यवस्था केली होती. दुतर्फा हिरवे झेंडे लावून मार्ग सजविण्यात आला होता. मिरवणूकीत सहभागी भाविकांना ओली खजूर, बिस्कीट, पाण्याचे वाटप केले जात होते. बडी दर्गाच्या प्रारंगणात मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. यावेळी फातेहा व दरुदोसलामचे पठण करण्यात आले. शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाकाहारी महाप्रसादाची प्रथाबडी दर्गा युवक मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही महाप्रसाद (लंगर)चे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजेपासून दर्गाच्या मैदानात भाविकांना शाकाहारी पुलाव वाटप केला जात होता. सुमारे २१०० किलो महाप्रसादाचा लाभ यावेळी भाविक ांनी रात्री दहा वाजेपर्यंत घेतला. हुसेनी बाबा यांना शाकाहार प्रिय होता त्यामुळे दरवर्षी या महाप्रसादाच्या वाटपाची प्रथा पाळली जाते.