याबाबत सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, मागील काही दिवसांपासून भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मोबाइल चोरीचे प्रकार वाढले होते. यामुळे गुन्हे शोध पथकाद्वारे चाचपणी केली जात होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या, त्यानुसार पथकाने माहिती घेतली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित शफिक तौफिक शेख (वय ३५ रा. कमलापुरा, मालेगाव ) यास ताब्यात घेतले. शफिक हा मागील काही वर्षांपासून जुने नाशिक भागात वास्तव्यास आहे. त्याचा दुसरा साथीदार संशयित मोहंमद आमीन अब्दुल रहीम अन्सारीच्या (४०, रा. नयापुरा, अरब चौक, मालेगाव) मदतीने मोबाइल चोरी वेगवेगळ्या परिसरात केल्याची कबुली दिली. त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता चोरी केलेले एकूण ३८ मोबाइल मिळून आले. या दोघा संशयित मोबाइल चोरांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे खन्ना यांनी यावेळी सांगितले. मोबाइल चोरट्यांची साखळी तोडण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
चोरट्यांकडून ३८ मोबाइल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:14 AM