पंचवटी : परिसरातील मालेगाव स्टँड व निमाणी बसस्थानक परिसरात पंचवटी पोलिसांनी सोमवारी (दि.१९) रोजी दुपारी मोहीम राबवून १८८ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली़ पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली़ वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालविताना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करताना सुमारे १८८ रिक्षाचालक वाहन तपासणी मोहीम दरम्यान पोलिसांना आढळून आले. या रिक्षाचालकांकडून सुमारे ३७ हजार ६०० रुपयांचा दंडवसूल करण्यात आला. रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याने तसेच उघडपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने पंचवटी पोलिसांमार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे. आगामी काही दिवस पंचवटी परिसरातील वाहतूक वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.पंचवटीत रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक रिक्षाचालक भाविकांकडून अव्वाच्या सव्वा भाडेवसुली करतात. पंचवटी पोलिसांमार्फत यापुढेही रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी कागदपत्रे तपासणी करून दोषी आढळलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच ठेवणार आहे- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी
पंचवटीत ३८ हजारांचा दंडवसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:30 AM