नाशिक : महापालिकेने करारनाम्याची मुदत संपुष्टात आलेल्या गाळेधारकांवर वाढीव दराने भाडेवसुली मोहीम राबविल्यानंतर पहिल्या टप्प्यात ३९८ गाळेधारकांनी थकबाकीचा भरणा केला असून, त्यातून महापालिकेने दोन कोटी ७८ लाख रुपये वसूल केले आहेत. थकबाकीचा भरणा न केल्याने ८५ गाळ्यांवर जप्तीची कारवाई केली असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.महापालिकेने ३१ मार्च २०१४ आणि ३१ मार्च २०१५ रोजी मुदत संपलेल्या गाळेधारकांकडून वाढीत दराने भाडेवसुलीची मोहीम सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात ५० हजारांच्यावरील रक्कम थकबाकी असलेल्या गाळेधारकांवर कारवाई करण्यात आली. सिडको वगळता महापालिकेच्या पाचही विभागांत वसुलीची धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात ९८३ थकबाकीदारांपैकी ३९८ गाळेधारकांनी प्रतिसाद देत थकबाकीचा भरणा केला. त्यातून महापालिकेला दोन कोटी ७८ लाख ४७ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला. पश्चिम विभागातून सर्वाधिक एक कोटी ९३ लाख ३२ हजारांची वसुली करण्यात आली. थकबाकीचा भरणा न केल्याने ८५ गाळे जप्त करण्यात आले आहेत. संबंधित गाळेधारकांना थकबाकीची रक्कम भरण्याची संधी देण्यात आली असून, त्यांनी भरणा केल्यास त्यांना गाळे खुले करून दिले जातील. मोहिमेत सर्वाधिक ३६ गाळे नाशिकरोड विभागात जप्त करण्यात आले.
३९८ थकबाकीदार गाळेधारकांकडून वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:56 AM