नाशिक : शहरातील ६६ महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या उपलब्ध असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी तिसरी गुणवत्तायादी बुधवारी (दि.१२) प्रसिद्ध झाली असून, या यादीत ३७८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून त्यांना आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (दि. १४) मुदत देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत आर.वाय.के. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा जनरलचा कटऑप ४०९ गुणांपर्यंत आला आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये असलेल्या जागांवरील प्रवेशासठी केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात येत असून, आतापर्यंत दोन गुणवत्तायाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दोन्ही यादींत नावे आली नाहीत त्यांना तिसऱ्या यादीची प्रतीक्षा होती.
आतापर्यंत ११,१६८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये अद्यापही दहा हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या गुणवत्तायादीनुसार तीनही विद्याशाखांसाठी एकूण ३७८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपले प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाखानिहाय संधी मिळालेले विद्यार्थीकला - ५५७
वाणिज्य -१०२३विज्ञान - २११६
एचएसव्हीसी - ८५
पसंतिक्रमानुसार विद्यार्थी संख्या
१ - १८४७२ - ७६६
३ - ४७६४ - २८९
५ - १७३
महाविद्यालयनिहाय विज्ञानचा कटऑफ
आर.वाय.के. महाविद्यालय - ४०९
सर एम.एस. गोसावी कॉलेज - ३९२बॉइज टाऊन कनिष्ठ महाविद्यालय - ४०५
केे.टी.एच.एम. कॉलेज - ३८३केव्हीएन नाईक महाविद्यालय - ३८६
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय - ३५७नाशिकरोड महाविद्यालय - ३३७
सिडको कॉलेज - ३७५
वाणिज्य शाखेलाही पसंती
विज्ञान शाखेबरोबरच वाणिज्य शाखेलाही विद्यार्थ्यांची चांगली पसंती मिळत असून लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात तर विज्ञानपेक्षा वाणिज्य शाखेचा कटऑफ जास्त आहे. येथे वाणिज्य शाखेला ४२२ गुणांचा कटऑफ लागला आहे. तर सर एम.एस. गोसावी महाविद्यालयात ३६१ गुणांचा कटऑफ लागला आहे. वाणिज्य शाखेच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधींमुळे या विद्याशाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसते.