नाशिक : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व मागास घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ४२० शाळांमध्ये ४ हजार ९२३ जागा उपलब्ध झाल्या असून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार (दि.१६) पासून होत आहे. मात्र त्या जिल्ह्यात शाळा नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, अशा जिल्ह्यांमध्ये ही गुरुवारी (दि.१७) दुपारी ३ वाजेनंतर अर्ज भरता येणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे २०२२-२३ या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने २३ डिसेंबरलाच जाहीर केले आहे. त्यानुसार २८ डिसेंबर ते ९ मे दरम्यान ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र महिनाभरानंतरही वेळापत्रकानुसार आरटीईचे संकेतस्थळ सुरू होऊ शकले नसल्याने प्रक्रियेची मुदत वाढवून देण्यात आली होती. शाळांची पुनर्तपासणी करून १७ जानेवारीपर्यंत आरटीई प्रवेशपात्र शाळांची यादी जाहीर केली जाणार होती. परंतु ही मुदत संपुष्टात येऊनही संकेतस्थळच सुरू होऊ शकलेले नसल्याने शाळा पडताळणीची मुदत वाढवून सुरुवातीला ३१ जानेवारी व नंतर १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून नाशिक जिल्ह्यात जवळपास ४२० शाळांमध्ये ४ हजार ९२३ जागा उपलब्ध असल्याची माहिती शिक्षण विभागाने पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे.
--
२०२२-२३ आरटीई प्रवेशाची स्थिती
नोंदणीकृत शाळा - ४२०
उपलब्ध जागा -४९२४
--
२०२१-२२ आरटीई प्रवेशाची स्थिती
नोंदणीकृत शाळा- ४५०
उपलब्ध जागा - ४५४४
एकूण अर्ज - १३३३०
लॉटरीतून निवड -४२०८
नियमित प्रवेश निश्चित ३२०५
प्रतीक्षा यादीतील प्रवेश -३२५