नाशिक : त्रंबकेश्वर रस्त्यावर बेळगाव ढगा शिवारात पाझर तलावात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशीच शिंदे कुटुंबावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन युवतींचा आणि एक महिलेचा समावेश आहे. या घटनेने नाशिकमध्ये शोककळा पसरली सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील सातपूर परिसरात चौघांच्या मृत्यूची दुर्घटना घडली. आज सकाळी येथील शिंदे कुटुंबीयांच्या घरात वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाल. त्यानंतर, दुपारी आपल्या सुनेसह लहान मुलींना घेऊन कुटुंबातील मनिषा शिंदे या बंधाऱ्यावर भांडे घासण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी लहान मुलीचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी पाण्याचा अंदाज न आल्याने मनिषा शिंदे यांच्यासह त्यांची सून आणि इतर एक अशा चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ऐन गणेश चतुर्थीच्या सणादिवशीच शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनिषा शिंदे (40), वृषाली शिंदे (19), ऋतुजा शिंदे (16) आणि आरती शिंदे (28) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.