कळवण : शैक्षणिक गुणवत्तेच्या जागतिक क्र मवारीत ग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ (पिसा) या अहवालानुसार आशिया खंडातील सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, हॉँगकॉँग हे देश सर्वांत पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील चाळीस प्राथमिक शिक्षक सिंगापूरला भेट देणार असून, यात नाशिक जिल्ह्यातून कळवण तालुक्यातील पाटविहीर शाळेचे शिक्षक नीलेश भामरे यांची निवड झाली आहे. दि. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत हा दौरा होणार आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक म्हणून काम करताना भामरे यांनी राज्यभरातील अनेक प्रयोगशील शाळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. आदिवासी भागातील विद्यार्थी अध्ययनात मागे राहू नये तसेच इंग्रजी भाषेची अधिक तयारी करता यावी म्हणून त्यांनी ब्रिटिश कौन्सिल व महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेल्या विविध प्रशिक्षणे घेऊन विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पाटविहीर शाळेत सेवेत असलेल्या भामरे यांची शाळा जिल्हास्तरावर गुणवत्ता विकासात प्रथम आली आहे. स्वछ शाळा सुंदर शाळा, तंबाखूमुक्त शाळेचा जिल्हास्तरीय पुरस्कार शाळेला मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. नीलेश भामरे यांच्या निवडीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे, मुख्याध्यापक भिकूबाई सोनवणे, पदवीधर शिक्षक चंद्रभान पवार, सहशिक्षक बाजीराव गावित, साळूबाई बागुल, मीनाक्षी अहेर, सरला अहिरराव, वंदना सपकाळे आदिंनी अभिनंदन केले आहे. शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना परदेशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यात ३ शाळाभेटी आणि तीन कार्यशाळांचा समावेश असून, सिंगापूरच्या दौऱ्यात शिक्षक तेथील शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करणार आहेत. (वार्ताहर)
सिंगापूर दौऱ्यात राज्यातील ४० शिक्षक
By admin | Published: January 26, 2017 1:14 AM