गरजवंत : हो मी ..... बोलत आहे , नाशिकवरून
एजंट : बोला
गरजवंत : आपल्याला टुझी (टॉसिलेझमब इंजेक्शन ) मिळेल का
एजंट : हो आहे , जळगावला ॲव्हेलेबल आहे दादा
गरजवंत : काय रेट जाईल मला ते ...
समोरुन : दोन लाख ४५ हजार रुपये दादा ...खात्री करून घ्या....येताना आइसबॉक्स घेऊन या .... कारण एकदा इंजेक्शन दिल्यावर आमची जबाबदारी राहत नाही.
हा संवाद आहे टॉसिलिझमब ४०० एमजी या इंजेक्शनच्या संदर्भातील !. रेडमेसिविर इंजेक्शन दिल्यानंतरही रुग्णाची स्थिती सुधारली नाही आणि स्थिती अगदीच गंभीर असेल तर डॉक्टर या इंजेक्शनची शिफारस करतात. अतिशय महागड्या असलेल्या या एका इंजेक्शनची मेडिकल दुकानात ४० हजार इतकी किंमत आहे. मात्र, सध्या टंचाईमुळे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असून, एक इंजेक्शन तब्बल अडीच लाख रुपयांना विकले जात आहे. नाशिकमधील एका गरजवंताने धुळे येथील एका व्यक्तीला माेबाइलवरून झालेला संवाद ‘लोकमत’ला उपलब्ध झाला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या राज्यात सर्वत्र या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून, त्याचा काळाबाजार सुरू आहे. नाशिकमधील एका गरजवंताला या इंजेक्शनची सक्त गरज असल्यामुळे दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होता. या संदर्भातच त्याने धुळे येथे फोन केला होता. मात्र समोरच्या व्यक्तीने तेव्हा फोन उचलला नाही. मात्र नंतर त्याचा फोन आला. इंजेक्शन उपलब्ध असून, त्याची किंमत दोन लाख ४५ हजार इतकी आहे असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. हे ऐकून त्या गरजवंताला धक्काच बसला. त्यामळे सरकारी यंत्रणांनी कितीही निर्बंध आणले तरी प्रत्यक्षात काय स्थिती आहे, हे दर्शविणारा हा धक्कादायक कारभार उजागर झाला आहे.
इन्फो...
अन्न, औषध प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
नाशिकमधील एका गरजवंत इसमाने या एजंटसोबत झालेल्या संवादाचे केलेले पूर्ण रेकॉर्डिंग अन्न व औषध प्रशासन विभागाला पाठविले आहे. आता अन्न व प्रशासन विभाग यावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. या इंजेक्शनचा सुरू असलेला काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.