नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंख्येने जिल्ह्यात प्रथमच चार हजारांचा तर शहरात दोन हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ४०९९ रुग्ण बाधित आढळले असून, नाशिक शहरातही तब्बल २०९० रुग्ण बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात नऊ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२८३वर पोहाेचली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २६) तब्बल ४०९९ बाधित रुग्ण, तर २१५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक मनपा क्षेत्रात चार, ग्रामीणला चार, तर जिल्हा बाह्य एक असे एकूण नऊ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२८३वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून तर कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने दोन हजारांवर राहिल्यानंतर बुधवारी तीन हजार पार, तर गुरुवारी तीन हजारांनजीक होती. शुक्रवारी बाधितांच्या संख्येने प्रचंड मोठा उच्चांक गाठला असून, आता कोरोनावरील नियंत्रण सुटत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित निघत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेलादेखील नागरिकांना केवळ नियम पाळण्याचे आवाहन करण्यावाचून पर्याय उरलेला नसल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षीपर्यंत कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या ही २०४८ होती. म्हणजेच गतवर्षातील सप्टेंबर महिन्याच्या उच्चांकी संख्येच्या दुप्पट कोरोना रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत.
इन्फाे
नाशिक मनपा क्षेत्रात प्रथमच दोन हजारपार
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारच्या एकाच दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल २०९० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरातदेखील सातत्याने हजार, बाराशेपेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी सापडण्याचा प्रकार प्रथमच घडून येत आहेे. नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाची सर्वाधिक दहशत निर्माण झाली असून, ग्रामीण भाग आणि उत्तर महाराष्ट्रातून रुग्ण उपचारांसाठी नाशिकला येत असल्याने बाधितांच्या वाढत्या संख्येने शहरातील ऑक्सिजन बेडदेखील अपुरे पडू लागले आहेत.
इन्फो
प्रलंबित पुन्हा साडेपाच हजारपार
दिवसाला तीन-चार हजारांचे अहवाल बाधित तर तितकेच अहवाल निगेटिव्ह येत असूनही प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा साडेपाच हजारांहून अधिक म्हणजे ५५१७वर पोहोचली आहे. त्यामुळे आठवडाअखेरपर्यंत बाधितांची संख्या कायम राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, ही वाढ अशीच कायम राहिल्यास प्रशासनाला पुढील महिन्यात अखेरच्या पर्यायाचा अवलंब करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.