नाशिक : महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असतानाही डेंग्यूचा डंख कमी होण्याची चिन्हे नसून पंधरा दिवसांत तब्बल ४१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबईच्या धर्तीवर डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल, अशा नागरिक आणि व्यक्तिगत सोसायट्यांना नोटिसा बजावणे सुरू झाले असून, आता घर न घर तपासणी हाती घेण्यात येणार आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी १६ जणांना डेंग्यू झाल्याचे महापालिकेच्या तपासणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कामे सुरू करूनही डेंग्यु रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश गेल्याचे आठवड्यात दिले होते. मात्र डेंग्यू डासांचा उपसर्ग कमी होण्याची चिन्हे नाहीत उलट आत्तापर्यंत ४१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजे जुलै महिन्यात ९४ संशयित रुग्ण आढळले होते. त्यात फक्त१४ जणांना आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, यंदा गतवर्षीच्या जवळपास तिप्पट रुग्ण आढळले आहेत. याप्रकारामुळे चिंता वाढली आहे, तर महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, तातडीने उपाययोजना सुरू करण्यासाठी धावपळ सुरू आहे. डेंग्यू डासाची उत्पत्ती नागरी भागात घर आणि छतावरील पाण्यात होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा निचरा न केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी महापालिकेने दंड थोपटले आहेत. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर डासांची उत्पत्ती होत असेल किंवा पाणी साचल्याने डासांच्या अळ्या होत असतील, अशा नागरिकांना तसेच सोसायटी आणि व्यापारी संकुलांवर धडक कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. सोसायट्यांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड केला जात असून, त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. याशिवाय प्रत्येक घर न घर तपासण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे प्रत्येक घर तपासून पाणी साचले आहे किंवा डासांची उत्पत्ती होते किंवा नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे, असे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले.तळघर बंद कोण करणार?शहरातील बहुतांशी व्यापारी संकुलांच्या तळघरात पाणी साचते. त्यामुळे तळघरे बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी गेल्या महिन्यातील आढावा बैठकीत दिले होते. मात्र, वैद्यकीय विभागाला हे शक्य नसून त्यांनी हे काम नगररचना विभागच करू शकत असल्याने नगररचना विभागाकडे जबाबदारी सोपवली आहे.
पंधरा दिवसांत ४१ डेंग्यू रुग्ण : आरोग्य यंत्रणा खडबडून जागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:43 AM