नाशिक : उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश व महाप्रबंधक आमच्या ओळखीचे असल्याचे सांगत आमिष दाखवून जिल्हा न्यायालयातील वकील संशयित यशोदीप मनोहर वाघ व त्यांचे वडील मनोहर वाघ यांच्यासह दुर्गा वाघ यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादी अंबादास मुरलीधर भालेराव यांच्या फिर्यादीवरून ४१ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भालेराव यांचे मुंबई उच्च न्यायालयासह नाशिक जिल्हा न्यायालयात विविध खटले सुरू आहेत. खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्याचे आमिष दाखवून वाघ व त्यांच्या कुटुंबीयांनी संगनमताने वेळोवेळी भालेराव यांच्याकडून ८ मार्च २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या कालावधीत सुमारे ४१ लाख १५ हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नाशिक जिल्हा न्यायालय व मुंबईतील उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा निकाल तुमच्या मर्जीनुसार लावून देण्याच्या मोबदल्यात त्यांनी रक्कम उकळली. त्यानंतर भालेराव यांच्यासह अन्य पक्षकारांनी संशयित वाघ यांच्याकडे खटल्यांचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर वाघ कुटुंबीयांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरु वात केली. तसेच दमबाजी करत खोट्या खटल्यांमध्ये अडकवू तसेच आम्ही तुमच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करू, असे धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भालेराव यांच्यासह अन्य पक्षकारांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. वाघ कुटुंबीयांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.
वकिलाकडून ४१ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:56 AM
उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश व महाप्रबंधक आमच्या ओळखीचे असल्याचे सांगत आमिष दाखवून जिल्हा न्यायालयातील वकील संशयित यशोदीप मनोहर वाघ व त्यांचे वडील मनोहर वाघ यांच्यासह दुर्गा वाघ यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादी अंबादास मुरलीधर भालेराव यांच्या फिर्यादीवरून ४१ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देआमिष : संशयित वकिलासह आई-वडिलांवर गुन्हा