विहीरींनी तळ गाठल्याने वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तीव्र टंचाईच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील गावांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुका पंचायत समिती स्तरावर टॅँकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या अनेक भागात चारा व पाणी टंचाई जाणवत आहेत. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामाची पिके वाया गेली, तर रब्बीची पेरणी झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. त्याचबरोबर पुर्व भागात भूजल पातळीही झपाट्याने खालवत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सररासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे सिन्नरसारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यातील शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. तालुक्यात वाढत्या उन्हाबरोबर पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले आहे. पूर्व भागातील अनेक गावे पाणी टंचाईने बाधीत झाली आहेत. यावर्षी शेतीसाठी पाणी सोडाच; परंतु पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने सुमारे लाखांच्यापुढे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर विसंबून रहावे लागते आहे. काडी गावांच्या पूरक नळपाणी पुरवठा करणाऱ्या उद्भव विहिरी आटल्याने ग्रामपंचायतींच्या योजना कोलमडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात उशीराच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात दिलासा दिला आहे. मात्र या उलट पूर्व भागात पाऊसच झाला नसल्याने नद्या, नाले, नालाबडींग, पाझर तलाव, सिमेंट बंधारे कोरडे पडले आहेत. परिणामी भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने विहिरी आटल्या आहेत. उन्हाची तीव्र वाढल्याने ज्या विहिरींना अद्यापपर्यंत थोड्याफार प्रमाणात पाणी होते त्यांचे पाणी आटले आहे. पिण्यासाठी वणवण भटकंती करूनही पाणी मिळत नसल्याने पंचायत समितीकडून ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. तालुक्यात गेल्या वर्षीपासून टॅँकरने काही गावांची तहान भागविली जात आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत टॅँकरची संख्या वाढतच गेली आहे. तालुक्याच्या काही भागात चारा व पाणी या दोन्ही गोष्टी सद्या शेतकऱ्यांना विकतच घ्यावा लागत आहे.
सिन्नर तालुक्यात १६ गावे व २११ वाड्या-वस्त्यांवर ४१ टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 5:52 PM