नाशिक : नाशिक जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४१ हजार ८०० लसींचा स्टॉक दाखल झाला आहे. त्यात ३२ हजार ७०० लस ही ‘कोविशील्ड’ची असून, ९ हजार १०० लस ‘कोवॅक्सिन’ची आहे.
जिल्ह्यातील पहिल्या टप्प्याच्या निर्धारीत लसीकरणाच्या तुलनेत ९० टक्क्यांच्या आसपास लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासाठी या लसी दाखल झाल्या आहेत. त्यातही प्रामुख्याने ‘कोविशील्ड’च्या लसींचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या टप्प्यात आलेली लस ही ‘कोवॅक्सिन’ची आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा लस घेणाऱ्या व्यक्तिंना आता ‘कोविशील्ड’ची लस दिली जाणार आहे. मात्र, नवीन लस घेणाऱ्यांना ‘कोवॅक्सिन’ची लस देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलीस आणि विविध क्षेत्रातील पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रासाठी आलेल्या स्टॉकमधून नाशिक जिल्ह्याला ४३ हजार ४४० लस प्राप्त झाली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात त्या तुलनेत सुमारे दीड हजार कमी लस प्राप्त झाली आहे.
इन्फो
निर्धारित तापमानात साठवणूक
जिल्हा रुग्णालयातील लस साठवणूक दालनातील वॉक इन कुलरमध्ये सुमारे ५ डिग्री सेंटिग्रेडला या लसी अनेक मोठ्या बॉक्समध्ये साठवून ठेवण्यात आल्या आहेत. या लसींचे तापमान कायमस्वरूपी २ ते ८ डिग्रीपर्यंत ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य केंद्रांमध्ये व्हॅनमधून नेतानाही या लसी आईसलँड रेफ्रिजरेटरमधून (आयएलआर) नेण्यात येणार आहेत.