लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेत पुनर्स्थापित करण्यात आलेल्या विधी, आरोग्य आणि शहर सुधार या तीन समित्यांसह वृक्षप्राधिकरण तसेच जैवविविधता समित्यांवर सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया शुक्रवारी (दि.२६) होणाऱ्या महासभेत पार पडणार आहे. एकूण ४२ नगरसेवकांच्या कुंडलीत शुक्रवारी लाभयोग असून, कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, महासभेत राष्ट्रवादीने शहरातील स्वच्छतेसंबंधी दाखल केलेल्या लक्षवेधीवरही चर्चा झडण्याची शक्यता आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने आपल्या सदस्यांना अधिकाधिक लाभाची पदे मिळावीत यासाठी विधी, आरोग्य व शहर सुधार या तीन विषय समित्या पुनर्स्थापित केल्या आहेत. या तीनही समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्य राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार नियुक्त केले जाणार आहेत. त्यात, भाजपाचे सर्वाधिक ५, शिवसेना ३ आणि कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यापैकी एक सदस्य असणार आहे.समित्यांवर भाजपाचाच वरचष्मा असल्याने सभापती-उपसभापतिपद भाजपाकडेच राहणार आहे. याशिवाय, महासभेत वृक्षप्राधिकरण समितीवरही सदस्य नियुक्तीप्रक्रिया राबविली जाणार आहे. वृक्षप्राधिकरण समितीवर १५ पैकी ९ सदस्य हे नगरसेवकांमधून नियुक्त करायचे असून, उर्वरित चार सदस्य हे अशासकीय असणार आहेत. आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असतात. वृक्षप्राधिकरण समितीवरही भाजपाचे सर्वाधिक पाच, तर सेना-३ व कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यापैकी एक सदस्य नियुक्त होणार आहे. याच महासभेत जैवविविधता व्यवस्थापन समितीवर महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांमधून सहा सदस्य आणि एक प्रशासनातील अधिकारी यांची निवड केली जाणार आहे. त्यात सहा नगरसेवकांमध्ये दोन जागा महिलांसाठी व दोन जागा एस.सी., एस.टी. सदस्यांसाठी आरक्षित आहे. सदर समितीचा कार्यकाल पाच वर्षांसाठी असणार आहे. पाच समित्यांवर तब्बल ४२ नगरसेवकांची नियुक्तीप्रक्रिया राबविली जाणार असून, त्यात भाजपाचे २४, शिवसेना १३ आणि कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या ५ सदस्यांचा समावेश आहे.
४२ नगरसेवकांच्या कुंडलीत आज ‘लाभयोग’
By admin | Published: May 26, 2017 12:31 AM