लोकमत विशेषनाशिक : जंगलतोडीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणारा बिबट्याला महामार्गावरील बेफाम वाहतुकीला बळी पडावे लागत आहे. या चार वर्षांमध्ये ४२ बिबट्यांना शहरासह जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्यांवर अपघातात प्राण सोडावा लागला असून, निसर्गाची ही अपरिमितहानी रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांसह नागरिकांनी जबाबदारीने सुरक्षित वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.बिबट्याचा रस्त्यांवर अपघात होऊन मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, निसर्गाची मोठी हानी यामुळे होत आहे. निसर्गाची हानी रोखण्यासाठी नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. महामार्गावरून रात्री तसेच दिवसाही वेगमर्यादेचे पालन करत मार्गस्थ व्हावे. रात्रीच्या वेळी वन्यजिवांचा वावर महामार्गाच्या कडेला वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आजूबाजूच्या जंगलाचा अंदाज घेत किमान वेगमर्यादेत वाहन त्या भागातून चालविण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. आडगावजवळ मंगळवारी मृतावस्थेत आढळलेला बिबट्यादेखील अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन गतप्राण झाल्याचे समोर आले आहे. मानव-बिबट संघर्ष जिल्ह्यात अनेकदा काही तालुक्यांमध्ये निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. मनुष्यप्राण्याने आपल्या हव्यासापोटी निसर्गाला ओरबाडण्यास सुरुवात केल्यामुळे बिबट्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. बिबट्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवास व मुबलक खाद्य उपलब्ध होत नसल्यामुळे त्याने मानवी वस्तीकडे मोर्चा वळविला आहे. मार्जार कुळातील हा वन्यप्राणी कुठल्याही अधिवासासोबत तितक्याच तत्परतेने जुळवून घेण्यास तरबेज आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागात बिबट जेरबंद होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावरून मानव-बिबट संघर्ष ओढवला असून, त्यावर जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांचा बिबट व अन्य वन्यप्राण्यांविषयीचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.मुंबई-आग्रा महामार्ग अधिक धोक्याचामुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत कसारा घाट ओलांडल्यानंतर थेट मालेगावपर्यंत मोठ्या संख्येने बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हा महामार्ग नाशिक पूर्व व पश्चिम वनविभागाच्या हद्दीतून जातो. यासंदर्भात ज्या भागात वन्यजिवांचा वावर अधिक आहे तेथे महामार्गाभोवती लोखंडी रेलिंग बसविणे तसेच रस्त्यालगत ठळक अक्षरात वन्यजिवांच्या छायाचित्रासह सूचना फलक लावण्याबाबतचे पत्र राज्य महामार्ग प्राधिकरण विभागाला दिले जाणार असल्याचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम यांनी सांगितले.
४२ बिबट्यांनी सोडला रस्त्यावर प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:26 AM