नाशिक : महाराष्ट शासनाच्या शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व अजूनही कायम असून, गेल्या १८ तारखेला झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातून सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील २७७ केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण परिषदेच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा गेल्या १८ रोजी घेण्यात आली. इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून २४,७५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तर २४,१२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १५३ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून १९,०५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मात्र १८,५५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवला, नाशिक मनपा आणि मालेगाव मनपामध्ये एकूण २७७ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली. नाशिक महापालिका हद्दीत पाचवीच्या ३० तर आठवीच्या ५८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. तर मालेगावमध्ये एकूण १३ केंद्रांवर दोन्ही वर्गाची परीक्षा घेण्यात आली. प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी अशा विषयांची ही परीक्षा असून, शिष्यवृत्ती पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण जिल्हानिहाय मजूर शिष्यवृत्तीच्या संचानुसार पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घोषित केले जाते.
४२ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:27 AM