सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या पॅकेजिंगचे खोके बनविणाऱ्या कारखान्यातून माल खरेदी करुन तो भंगारात विकणाऱ्या संशयितास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या चार कारखान्यांना सुमारे ४३ लाख रुपयांना गंडा घातला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी दिली. जीवन चंदू पवार (४३) हल्ली रा. दिव्या रो हाऊस, सरदवाडी रोड, सिन्नर (मूळ रा. वालखेडे ता. शिंदखेडा जि. धुळे) असे संशयिताचे नाव आहे. पवार हा स्वत:चा चाकण (पुणे) जवळील मोशी औद्योगिक वसाहतीत पुकराज इंडस्ट्रिज नावाने व्यवसाय असल्याचे सांगत होता. संशयित पवार याने माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या शाम इंटरप्रायजे या कारखान्यातून कोरुगेटेड प्लेटचा माल घेतला होता. दीड महिन्यात सदर मालाचे पैसे देतो असे सांगून त्याने सदर कारखान्यास बॅँक आॅफ बडोदाचे धनादेश दिले होते. मात्र शाम इंटरप्रायजेसला दिलेले दोन्ही धनादेश वटले नाही. त्यामुळे सुपरवायझर भीमराज पाटील यांनी त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. आपल्याप्रमाणेच पवार याने अन्य कारखान्यातून कोरुगेटेड बॉक्सेस, प्लेट व टू प्लाय रोल खरेदी केल्याचे चर्चा झाली. पवार माल खरेदी केल्यानंतर मोशी येथील कारखान्यात न नेता सिन्नरच्या आडवा फाटा भागातील गोडावूनमध्ये उतरवत होता. त्यामुळे या कारखान्यातील व्यवस्थापनाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सपकाळे यांना या घटनेची माहिती दिली. सपकाळे यांनी कारखाना व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना पवार याच्यावर पाळत ठेवण्याची सूचना केली. त्यानुसार पवार याने मंगळवारी भावना पॅकेजिंग येथून माल घेतला. तो माल मालट्रकमध्ये भरुन त्याने थेट पंचवटीतल्या भंगार दूकानमध्ये नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर माल भंगारमध्ये विकत असतांना पोलीस हवालदार लक्ष्मण बदादे व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. शाम इंटरप्राईजेस कारखान्याचे सुपरवायझर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी जीवन चंदू पवार याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास बुधवारी सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (वार्ताहर)
माळेगावच्या उद्योजकांची ४३ लाखांची फसवणूक
By admin | Published: December 24, 2015 12:10 AM