नाशिक : महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला नाशिक जिल्ह्यातून पाचवी व आठवी मिळून ४३ हजार ३५५ विद्यार्थी सामोरे गेले, तर १ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. जिल्हाभरात रविवारी (दि.२४) २७८ केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. या १५६ परीक्षा केंद्रांवर २५ हजार १९४ पाचवीच्या, तर १२२ परीक्षा केंद्रांवर १८ हजार ६६१ आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली.नाशिक जिल्ह्यातून पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून २६ हजार १६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील २५ हजार १९४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर तब्बल ९६७ जण गैरहजर होते. १५६ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली, तर आठवीसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परीक्षेसाठी १९ हजार २३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १८ हजार ६६१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर ५७७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. परीक्षेचा पहिला पेपर हा दुपारी १ ते २.३०, तर दुसरा पेपर ३.३० ते सायंकाळी ५ यावेळेत घेण्यात आला. पहिल्या सत्रात प्रथम भाषा आणि गणिताचा पेपर झाला. दुपार सत्रात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा पेपर पार पडला. एकूण ३०० गुणांची ही परीक्षा होती. पहिल्या सत्रातील प्रत्येक ७५ प्रमाणे दोन आणि दुसऱ्या सत्रातील दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी ७५ गुणांचे होते. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि गुजराथी या चार भाषांमध्ये ही परीक्षा झाली. जिल्हाधिकारी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे तीन भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत, तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके कार्यरत होती. जिल्ह्यात कोणताही गैरप्रकार न घडता परीक्षा सुरळीत पार पडली.
४३ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:30 AM