नाशिक: फेब्रुवारी-मार्चमध्ये जाहीर झालेल्या कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असताना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ४३५,६१,२३,५७८ अनुदान मंजूर देखील करण्यात आले आहे.
गेल्या जानेवारीत राज्यातील कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागला. कांद्याला दर नसतानाही शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि खासगी बाजार समितीत अत्यल्प दराने कांदा विकला होता. या प्रकरणाची दखल घेत शासनाने ‘ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समितीमध्ये तसेच नाफेडकडे कांदा विकला आहे, अशा शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान २०० क्विंटलच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला होता.
या योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते, त्या प्रस्तावांची छाननी होऊन १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या मार्फत सुरू करण्यात आली आहे.