नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षाही सुमारे दीडशे टक्के पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यमस्वरूपाच्या असलेल्या २४ धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठले होते. धरणांची साठवण क्षमता संपुष्टात आल्याने एकाच वेळी जवळपास तेरा धरणांचे दरवाजे उघडण्यात येऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पावसाचे मुबलक प्रमाण, धरणांतील साठा, नद्या, नाल्यांना आलेला पूर पाहता जमिनीखालील पाण्याच्या पातळीतही जवळपास चार ते पाच फूट पाण्याची पातळी वाढल्याने यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भासणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्वच धरणांमध्ये सरासरी ९९ टक्के जलसाठा कायम होता. त्यानंतर मात्र सिंचनाचे आवर्तन धरणांमधून सोडण्यात आले, त्याचबरोबर धरणांमध्ये विविध कारणांसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण सोडण्यात आले. अशातच मार्च महिन्यापासून जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने वाढले.
जिल्ह्यातील धरणाची साठवण क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, त्यात आता फक्त २८ हजार ९३७ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक राहिले आहे. म्हणजेच धरणांमध्ये ४४ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी दारणा धरणात ७६ टक्के इतके शिल्लक असून, नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात ९९ टक्के जलसाठा आहे. मालेगावसह जळगाव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया गिरणा धरणात यंदा ४१ टक्के पाणी असून, ओझरखेड ४८, चणकापूर ३८, हरणबारी ५५, पालखेड ३४ टक्के पाणी शिल्लक आहे. सध्या पाण्याची मागणी व बाष्पीभवनाचा प्रकार पाहता उपलब्ध ४४ टक्के जलसाठा अजून दोन महिने वापरावयाचा आहे.
दरम्यान, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात सध्या ४९ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण २६ टक्क्यांवर होते. सध्या गंगापूर धरणात ४४, कश्यपीत ८९, गौतमी गोदावरीत ३४ व आळंदीमध्ये ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणावर मराठवाडा, नगर जिल्ह्याचे आरक्षण आहे. त्याचबरोबर एचएएल, औद्योगिक वसाहत, एकलहरे वीज निर्मिती केंद्रालाही पाणीपुरवठा केला जातो.