आझादनगर : मालेगाव मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून गुरुवारी चंदनपुरी गेट ते गिरणा पूल (मोहनबाबानगर) पर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली. तथापि मरीमाता चौक रस्त्यावरील राज्य राखीव दलासाठी असलेली पोलीस चौकी काढण्यात न आल्याने परिसरातील नागरिकांकडून सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर येणारी पोलीस चौकी किराणा दुकान काढून सर्वसामान्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.मालेगाव शहरात एक महिन्यापूर्वीपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. मोहिमेचे शहरवासीयांकडून स्वागत करण्यात येत आहे. या मोहिमेस नागरिक स्वत: अतिक्रमण काढून सहकार्य करीत आहेत; मात्र काही ठिकाणी अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण काढताना सापत्नक वागणूक मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.गुरुवारी सकाळी १० वाजेपासून चंदनपुरी गेट ते मोहनबाबानगर पर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. या मोहिमेमुळे बालाजी चौक (बजरंगवाडी) येथे प्रथमच नागरिकांना पूर्ण रस्त्याचे दर्शन झाले. मरीमाता चौक (कालीकुट्टी) येथे सर्व अतिक्रमण काढण्यात आले; मात्र रस्त्यावर येणारी राज्य राखीव दल (पोलीस) चौकी व बाजूस असलेल्या किराणा दुकानाचा काही भाग काढण्यात आला नाही. यामुळे नागरिकांनी अतिक्रमण अधीक्षक दीपक हातगे यांना जाब विचारला. यावेळी एमआयएमचे शहराध्यक्ष अब्दुल मालिक घटनास्थळी झाले परंतु पोलिसांनी पत्रव्यवहार करून ती चौकी प्रथम रिकामी करून नंतर काढण्यात येईल अशी ग्वाही दीपक हादगे यांनी दिली. शेवटी चौकी व रस्त्याच्या मध्यभागी येणारे रोहित्र काढून सर्वांना समान न्याय देण्यात येऊन येथे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली.(वार्ताहर)
मालेगाव येथे ४५ अतिक्रमणे जमीनदोस्त
By admin | Published: February 18, 2016 10:34 PM