नाशिक : महापालिकेच्या घरपट्टी वसुली आधीच जिकिरीची झाली असताना त्यात दोन कर्मचाऱ्यांनी ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्राथमिक चाैकशी अंती सुषमा जाधव या महिला लिपिकास आयुक्त रमेश पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) तडकाफडकी निलंबित केले आहे, तर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे प्रशासनाला प्राथमिक चौकशीत आढळले आहे. महापालिकेने घरपट्टी विभागाचे संगणकीकरण केले असून कोणत्याही करदात्याला कोठेही कर भरण्याची सुविधा आहे. त्यासाठीच कर्मचाऱ्यांना पासवर्ड देण्यात आले आहेत. त्याचाच वापर करून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. नाशिकरोड आणि गांधी नगर या केंद्रांवर चेहेडी येथील भरणा केंद्रावरील संगणकाचे पासवर्ड वापरून भलत्याच पावत्या देण्यात आल्या आणि प्रत्यक्षात ही रक्कम भरण्यात आली नाही. यासंदर्भात महापालिकेने मार्च अखेरचा ताळेबंद तपासल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. नाशिकरोड येेथील विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांनी अहवाल सादर केलाच नाही. महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने देखील यासंदर्भात तपासणी केली होती. या संदर्भातील प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुषमा जाधव या महिला लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे, तर अन्य एका कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात येणार असून त्याच्यावरही गंभीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
नाशिक महापालिकेची मुळातच आर्थिक स्थिती चांगली नाही. घरपट्टी हाच उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. मात्र, घरपट्टी वसूल करणे मोठे आव्हानात्मक असून त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणा कामाला लावली असताना कुंपणच शेत खात असल्याचे उघड झाले आहे. अर्थात, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून हा प्रकार घडत असल्याचे सांगितले जात असले तरी इतके दिवस तो लक्षात कसा आला नाही, या दोन्ही कर्मचाऱ्यांना अन्य काेणत्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे काय, याचीही चर्चा हाेत आहे.