नाशिक : जिल्ह्यात थंडीची लाट ओसरून उन्हाची तीव्रता वाढू लागताच, धरणातील जलसाठ्यांमध्ये कमालीची पातळी खालावली असून, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जेमतेम ४५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. यंदा उन्हाळा कडक असणार असल्याचा हवामान खात्याने यापूर्वीच अंदाज वर्तविल्याने शिल्लक असलेला जलसाठा तब्बल सहा महिने पुरविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आजच सुमारे साडेतीनशे गावे, वाड्यांना पाणीटंचाई भेडसावू लागल्याने १११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्याने जिल्ह्यात ८३ टक्केच पाऊस नोंदविला गेला, त्यातही ठराविक वेळेत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणाची क्षमता पाहून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धरणे भरू शकली नाहीत. आॅक्टोबर अखेर ७३ टक्केच पाणी धरणांमध्ये साठले, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ३७ टक्के कमी होते. पाऊस कमी झाल्याने साहजिकच आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी वाढत असून, सद्यस्थितीत ३५० गावे, वाड्यांना १११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जानेवारीत थंडीचा कडाका वाढल्यामुळे पाण्याच्या वापराला काही प्रमाणात अटकाव बसला असला तरी, धरणांमध्ये सिंचनासाठी ठेवलेले आवर्तन सोडावे लागले, त्याचबरोबर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला. जानेवारीच्या तिसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम ४५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ५९ टक्के तर समूहात ६८ टक्के पाणी आहे. पालखेड व दारणा धरणात अनुक्रमे ३४ व ४१ टक्के जलसाठा असून, चणकापूरमध्ये ७८ तर हरणबारीत ५७ टक्के पाणी आहे. जळगाव जिल्हा व मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा धरणात ३१ टक्केच पाणी शिल्लक आहे.आगामी काळात उन्हाचा तडाखा वाढणार असून, त्याप्रमाणात धरणातील पाण्याचे बाष्पीभवन व गळतीचे प्रमाण वाढेल, त्याचबरोबर पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याबरोबरच, त्याची चोरी रोखण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्याचे पाणी जुलैअखेर पुरेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४५ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 6:49 PM
यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्याने जिल्ह्यात ८३ टक्केच पाऊस नोंदविला गेला, त्यातही ठराविक वेळेत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणाची क्षमता पाहून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धरणे भरू शकली नाहीत.
ठळक मुद्देउन्हाची तीव्रता : गंगापूर समूहात ६८ टक्के पाणीजिल्ह्यात आजच सुमारे साडेतीनशे गावे, वाड्यांना पाणीटंचाई