नाशिक : राज्य शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून सूट दिल्यानंतर उत्पन्नात येणारी घट भरून काढण्यासाठी राज्यातील २५ महापालिकांना आॅगस्ट महिन्याचे अनुदान लगेचच वितरित करण्याचा निर्णय घेत आश्चर्याचा धक्का दिला आहे. आॅगस्ट महिन्यासाठी नाशिक महापालिकेला ४५ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार असल्याची माहिती उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीतील सुमारे ३२ हजार व्यापाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. शासनाने घोषणा केल्यानंतर अनुदान कशाप्रकारे वितरित होणार, किती प्रमाणात होणार आणि वेळेत होणार की नाही, याबाबतच्या शंकाकुशंका व्यक्त होत असतानाच शासनाने आॅगस्ट महिन्याचे अनुदान लगेचच वितरित करण्याचा निर्णय घेत महापालिकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सन २०१५-१६ मध्ये वित्त विभागाने आॅगस्ट ते डिसेंबर २०१५ या पाच महिन्यांच्या कालावधीसाठी २०९८ कोटी ४० लाख रुपयांची पूरक मागणी मान्य केली आहे. १ आॅगस्ट २०१५ पासून शासनाच्या स्थानिक संस्था कराच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने महापालिकांना त्यांचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी शासनाने आॅगस्ट महिन्याचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील २५ महापालिकांसाठी आॅगस्ट महिन्याकरिता ४१९ कोटी ६९ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. नाशिक महापालिकेला आॅगस्ट महिन्यासाठी ४५ कोटी ८५ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून, येत्या तीन-चार दिवसांत सदर अनुदान महापालिकेला प्राप्त होईल. या अनुदानामुळे महापालिकेला उभारी मिळणार आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेला शासनाने आॅगस्ट महिन्यासाठी ८ कोटी ७३ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
45.85 कोटी
By admin | Published: August 05, 2015 12:23 AM