नाशिक : गत अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मुख्यालय इमारतीच्या रंगरंगोटीच्या सुमार दर्जाच्या कामाबाबत त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यालयाच्या रंगरंगोटी व दुरुस्ती कामाचा ४७ लाख रुपयांना टेंडर दिले होते. संबंधित ठेकेदाराने आतापर्यंत केलेल्या कामाचे देयक देऊन नवीन टेंडर प्रक्रिया राबवण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या सीई्ओ आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सीईओंनी कामाची चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीची डागडुजी अन् रंगरंगोटी करण्यासाठी गत आर्थिक वर्षात तब्बल ४७ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार इमारतीची केवळ बाहेरुन रंगरंगोटी करण्यात आली. मात्र लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील काही विभागात अक्षरश: छत गळके तर अनेक ठिकाणी पोपडे उडाल्याचे चित्र कायम आहे. मुख्यालयाच्या इमारतीतच केवळ वरवरच्या कामाचा मुलामा करण्याइतके निर्ढावलेपण संबंधित ठेकेदार आणि त्याची जबाबदारी असणारा जि.प.चा बांधकाम विभागच दाखवत असेल तर जिल्ह्याच्या अन्य भागांमधील कामांचे काय होत असेल ? किंबहुना तिथे डागडुजी, दुरुस्तीचा देखावा तरी केला जात असेल की नाही अशी चर्चा जिल्हा परिषद वर्तुळातच रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातमीतील तथ्यांची पडताळणी करण्यासह कामाच्या एस्टीमेटची माहिती मागवून घेतली होती. त्यानंतर स्वत: कामाबाबतची माहिती घेऊन संबंधितांना नोटीससह फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले आहेत.