नाशिक : गेल्या मंगळवारी (दि. २) झालेल्या अतिवृष्टीसह गोदावरीला आलेल्या महापुरामुळे अनेक भागांत रस्त्यांवर तसेच घरांमध्ये गाळ साचला आहे. सदर गाळ साफ करण्यासह पाणी उपसा करण्याची मोहीम मनपाच्या बांधकाम विभागाने हाती घेतली आहे. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा उचलण्याचेही काम युद्धपातळीवर सुरू असून, सुमारे ४८२ टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.महापालिकेच्या बांधकाम विभागाने सहाही विभागात मोहीम सुरू केली आहे. नाशिक पूर्व विभागात चार जेसीबी आणि दहा ट्रॅक्टर, एक स्क्रॅपरच्या मदतीने ७० कामगारांमार्फत २२ ठिकाणी पाणी व गाळ काढण्यात आला, तर ४८ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. पश्चिम विभागात पाच जेसीबी व सहा ट्रॅक्टरच्या मदतीने ६० कामगारांमार्फत १५ ठिकाणी गाळ व पाणी काढण्यात आले. तसेच १८६ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. पंचवटी विभागात आठ जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या मदतीने ५० कामगारांमार्फत १५ ठिकाणी गाळ व पाणी काढण्यात आले. ५८ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. नाशिकरोड विभागात दोन जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या मदतीने ३४ कामगारांमार्फत ५५ ठिकाणी गाळ व पाणी काढण्यात आले. १०४ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. सिडकोत ४५ कामगारांच्या माध्यमातून २७ ठिकाणी, तर सातपूर विभागात १५ कामगारांमार्फत तीन ठिकाणी गाळ व पाणी काढण्यात आले. दिवसभरात १३७ ठिकाणी पाणी व गाळ काढण्यात आला, तर ५५१ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. दरम्यान, शहरातून ४६५ मे.टन कचरा उचलण्यात आला. त्यासाठी घंटागाडीच्या १९५ फेऱ्या झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. याशिवाय, आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत पूरग्रस्त भागात तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी औषध फवारणी व जंतूनाशक पावडर टाकण्याचेही काम सुरू आहे.
४८२ टन कचरा उचलला
By admin | Published: August 06, 2016 12:51 AM