सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत गंगाघाटावरील शेकडो भाजीपाला विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य म्हणून भाजीबाजार हटविला खरा; मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तीन प्रमुख पर्वण्या संपल्यानंतरही पुन्हा पूर्वीच्याच जागेवर भाजीबाजार सुरू न झाल्याने शेकडो भाजीविक्रेत्यांची अडचण होत आहे. प्रशासनाने नदीपात्राचे प्रदूषण होऊ नये यासाठी भाजीविक्रेत्यांना नदीकाठावर बसण्यास विरोध दर्शविला असल्याने ते आता जागेची प्रतीक्षा करत आहेत. काही वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने गणेशवाडीतील आयुर्वेद रुग्णालयासमोर कोट्यवधी रुपये खर्चून भाजीमंडई उभी केली आहे. या मंडईत जवळपास ४०० हून अधिक ओटे भाजीविक्रेत्यांसाठी तयार करून त्याचे लिलाव केले आहेत. यातील काही ओट्यांचे लिलाव झाले आहेत, तर काहींचे लिलाव होणे बाकी आहे. गंगाघाटावरील भाजीबाजारात सुमारे ६५० भाजीविक्रेते असून भाजीमंडईच्या जागेत ४०० ओटे आहेत तर उर्वरित २५० विक्रेत्यांचे काय? असा सवाल विक्रेत्यांनी उपस्थित करून भाजीमंडईतील जागा विक्रेत्यांना अपुरी पडत असल्याचे गाऱ्हाणे मांडून आता थेट प्रशासनाकडे आयुर्वेद रुग्णालयाच्या मागे असलेल्या ५ एकर भूखंडाची मागणी केली आहे. प्रशासन विक्रेत्यांना भूखंड देणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही निश्चितता नाही. केवळ आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे अहवाल मागवला आहे. प्रशासनाने हा भूखंड उपलब्ध करून दिल्यास भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या भाजीमंडईची इमारत यापुढे अशीच धूळखात पडून राहणार की काय हे प्रशासनाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल. (वार्ताहर)
भाजीविक्रेत्यांना 5 एकर भूखंड
By admin | Published: December 28, 2015 11:32 PM