पंचवटी : प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक कंटेनर वापरण्यास बंदी असली तरी नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे दुकानात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोमवारी तीन दुकानांची तपासणी करण्यात येऊन ३५ किलो प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक कंटेनर, नॉन ओवन बॅग जप्त करत नियमांची पायमल्ली करणाºया दुकानदारांकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त सुनील बुकाने, पंचवटी विभागीय अधिकारी आर. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, दीपक चव्हाण, दुर्गादास माळेकर, स्वच्छता निरीक्षक राकेश साबळे, संजय जाधव यांनी कारवाई केली आहे.कॅरीबॅग तपासणीपंचवटीत प्रतिबंधित कॅरीबॅग तपासणी पथकामार्फत पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, पेठरोड, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, रामकुंड, हिरावाडी परिसरात पाहणी करत असताना दोघा दुकानदारांकडे व्यावसायिक प्रतिबंधित प्लॅस्टिक बॅग्स व कंटेनर वापर करीत असताना आढळल्याने कारवाई केली आहे. तसेच ओला, सुका कचरा वर्गीकरण न केल्याने २० हजार रुपये असा एकूण ३० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
पंचवटी विभागात ३५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:40 AM