नाशिक : कोरोनाबाधित रुग्णसंख्येने शुक्रवारी ३८० संख्येचा टप्पा गाठला, तर दिवसभरात ३६२ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला तीन, तर नाशिक शहरात दोन, असा एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृतांची संख्या २,१२७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाच बळी गेले असल्याने बळींमध्ये होत असलेली सातत्यपूर्ण वाढ नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २४ हजार ६८७ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १९ हजार १२६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात ३,४३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.५४ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.६२, नाशिक ग्रामीण ९६.१०, मालेगाव शहरात ९०.८२, तर जिल्हाबाह्य ९३.७७, असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ५४ हजार ००६ असून, त्यातील चार लाख २६ हजार ५५२ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २४ हजार ६८७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर २,७६७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.