नाशिक : पाकिस्तानमधून आलेली आणि आई-वडिलांच्या शोधात असलेली गीता गुरुवारी मध्यरात्री नाशिकमध्ये पोहोचली. सकाळपासून नाशिकचा गोदाकाठ हिंडूनही तिच्या ओळखीची कोणतीच खूण तिला दिसली नाही. दिंडोरी तालुक्यातील रमेश सोळसे यांनी ती आपली मुलगी असल्याचा केलेला दावा त्या व्यक्तीच्या पत्नीचा फोटो बघितल्यानंतर गीताने नकार दिल्याने आपसूकच बाद झाला. त्यामुळे गुरुवारी गीता आणि तिच्यासमवेत आलेल्या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा गीताला घेऊन इंदूर गाठण्याचा निर्णय घेतला. इंदूरच्या आनंद सर्व्हिस सोसायटी या मूकबधिर संस्थेचे पदाधिकारी गीताला घेऊन नाशिकमध्ये आले होते. गीताने तिच्या हावभावाद्वारे मूळ रहिवासी भागात नदी आणि बहुदा गोदावरी असावी, असा उल्लेख केला होता. मात्र, नाशिकमध्ये गोदाकाठ परिसर तसेच येथील कोणतीच खूण तिला ओळखीची वाटली नाही. तिला गोदावरीच्या काठाने आणि भातशेती होणाऱ्या तेलंगणातील गावांमध्ये नेले जाणार असल्याचे संस्थेचे सचिव ग्यानेंद्र पुरोहित यांनी सांगितले. मूकबधिर आणि कर्मकहाणी भारतात राहणारी मूकबधिर गीता २० वर्षांपूर्वी चुकून रेल्वेत बसून पाकिस्तानमध्ये गेली होती. त्यानंतर तिचा आई-वडिलांशी संपर्कच तुटला होता.पाकिस्तानी रेंजर्सना ती लाहोर स्थानकात समझौता एक्स्प्रेसमध्ये एकटी बसलेली आढळली, तेव्हा ती अवघ्या सात-आठ वर्षांची होती. तिला ईधी फाउंडेशनच्या एका व्यक्तीने दत्तक घेतले होते; मात्र भारतातील मुलगी पाकिस्तानमध्ये चुकून गेल्याचे तत्कालीन विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना समजले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तिला आणण्यात यश आले.
पाकिस्तानातून आलेल्या ‘गीता’ला नाशिकलाही भेटले नाहीत आई-वडील!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 3:10 AM