नाशिक : तीन वर्षांपुर्वी दिंडोरी तालुक्यात जबरी चोरी अन् एका ६५ वर्षी ज्येष्ठ नागरिकाच्या खूनाची घटना घडली होती. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. यावर सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.जी.गिमेकर यांनी जबरी चोरीप्रकरणी नीलेश नवसू बगर (३१) यास तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि पाच हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातून उत्तम विश्वनाथ चौथे याची पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तसेच खूनप्रकरणी संशयितांविरूध्द कुठलेही ठोस पुरावे न्यायालयापुढे सिध्द झाले नाही.आशेवाडी येथे १५आॅगस्ट २०१६साली संशयित निलेश नवसू बगर, सचिन राजाराम बगर, उत्तम विश्वनाथ चोथे या तीघा संशयितांनी मिळून आशेवाडी शिवारातील शिवाजी घोडके यांच्या शेतातील सुदाम पांडुरंग सितान (६५) यांच्या घरात बळजबरीने जबरी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. यावेळी सितान झोपलेले होते. यावेळी संशयितांनी त्यांच्या नावाने आवाज देऊन यांना घराबाहेर बोलावून लाकडी दंडुक्याने सितान यांना मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या गणेश माधव बोडके यांच्या मालकीच्या विहीरीत फेकून दिले होते. सुदाम यांच्या घरातील किंमती ऐवज संशियतांनी घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी आरोपी व संशियतांविरोधात खून, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी केला. सरकारी पक्षाच्या वतीने रविंद्र निकम यांनी युक्तीवाद केला. त्यावेळी त्यांनी सात साक्षीदार तपासले. दरम्यान, या गुन्ह्यातील संशियत सचीन बगर याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. तसेच संशियतांनी दरोडा टाकताना सुदाम यांचा लाकडी दंडुक्याने मारहाण करून खून केल्याचा कुठलाही ठोस पुरावा मिळून आला नाही; मात्र मयत सितान यांच्या घरातून चोरी झालेला मुद्देमाल आरोपी निलेशकडे सापडल्याने त्यास न्यायालयाने जबरी चोरी केल्याप्रकरणी ३ वर्ष सक्तमजूरी आणि ५ हजार रु पयांचा दंड ठोठावला. तर संशियत उत्तम चोथे याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
दरोड्याप्रकरणी आरोपीला ३ वर्षे सक्तमजूरी; एकाची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 6:36 PM
दंडुक्याने मारहाण करून खून केल्याचा कुठलाही ठोस पुरावा मिळून आला नाही; मात्र मयत सितान यांच्या घरातून चोरी झालेला मुद्देमाल आरोपी निलेशकडे सापडल्याने त्यास न्यायालयाने जबरी चोरी केल्याप्रकरणी ३ वर्ष सक्तमजूरी...
ठळक मुद्देखूनप्रकरणी कुठलेही ठोस पुरावे नाही.सात साक्षीदार तपासले.