नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीत काम करण्याच्या सुचना केल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागानेही सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ५० टक्के उपस्थितीतच कामकाज करण्याचे आदेश दिले असून याविषयी अंमलबजावणीची जबाबदारी संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच अकरावी सह पहिली ते नववीच्या जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ती कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून पालकांच्या संमतीने वर्ग सुरू ठेण्याची सवलत देण्यात आली होती. त्यानंतरर आता शिक्षण विभागाने शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही ५० टक्के उपस्थितीत कामकाज करण्याच्या सुचना केल्या असून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा व अन्य महत्वाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांसह शासनाच्या आदेशानुसार कार्यावाही करण्याच्या सुचना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयांच्या मुख्याध्यापकांना केल्या आहेत.
शाळांमध्ये ३१मार्चपर्यंत शिक्षक, शिक्षकेत्तरांची ५० टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:15 AM