सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, घरपट्टीची व पाणीपट्टी मिळून सुमारे ३१ कोटी वसूल झाल्या आहे. मुदत देऊनही थकबाकी न भरणाऱ्या ५०हून अधिक घरांचे नळकनेक्शन बंद केल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांना तगादे लावण्यात येत असून, यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांना मालमत्ता जप्तीपूर्वीच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कार्यालयाच्या अखत्यारित ९७ हजार ८७९ मिळकतधारक आहे. यंदाच्या वर्षी वरिष्ठांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास घरपट्टीचे ४६ कोटी ३५ लाख, तर पाणीपट्टीचे २० कोटी ८० लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टीचे मिळून ६७ कोटी १४ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी मिळकतधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, काही थकबाकीदारांना वॉरंट बजाविण्यात आले आहे. पाणीपट्टीच्या २० कोटी ८० लाख उद्दिष्टांपैकी शनिवार (दि.३०) पर्यंत ८ कोटी ८० लाख इतकी वसुली झाली आहे. थकबाकीदारांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.सुटीच्या दिवशी कामकाज३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असून, या दिवशी रविवार असल्याने मनपाच्या सिडको कार्यालयातील इतर विभागांचे कामकाज बंद राहणार आहे. परंतु घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी या विभागाचे कामकाज सुटीच्या दिवस असतानाही सुरू राहणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
सिडको भागात ५० नळजोडण्या खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:32 AM