नाशिक : वाढत्या शहरासाठी वरदान ठरलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्वारे अखेर नियमित पाणीपुरवठ्यास प्रारंभ झाला आहे. दररोज सुमारे ५० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे शिवाजीनगर येथून आता फक्त सिडको विभागालाच वितरण होत आहे. ऐन उन्हाळ्यात नाशिकच्या विकसित भागासाठी पाणी मिळाल्याने या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.नाशिक महापालिकेच्या वतीने वाढत्या विकासाचा विचार करून मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना राबविण्यात आली आहे. २६६ कोटी रुपयांच्या या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने ७० टक्के मदत करण्यात आली आहे. योजना काहीशा विलंबाने सुरू झाल्याने चाचणीसाठी वेळ गेला असला तरी तीन महिन्यांच्या चाचण्या अवघ्या एका महिन्यात पूर्ण करण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असल्याने गाजावाजा न करताच प्रशासनाने तयारी केली आणि प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू केला आहे.महापालिकेने पाथर्डी परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी प्रारंभी चार जलकुंभांची स्वतंत्र चाचणी करून पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर नव्या योजनेचे पाणी सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर जलकुंभातून पाथर्डी परिसराला जोडलेले पाणी कमी होत गेले.सिडको विभागाला आता १७० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत आहे. त्यात पाथर्डी येथील मुकणे धरणातील पाणीपुरवठा योजनेचादेखील समावेश आहे. सिडकोवासीयांवर पाणीपुरवठ्यात अन्याय होत असल्याची तक्रार यामुळे दूर झाली आहे.
मुकणेतून ५० एमएलडी पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:52 AM