राज्यातील ज्या सहा मोठ्या कारागृहांची चर्चा होते, त्यात नाशिकरोड कारागृहाचाही समावेश आहे. या कारागृहात एकेकाळी अतिरेक्यांना ठेवण्यात आल्यामुळे अंडासेलचीही निर्मिती करण्यात आलेली असून, मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांतील शूटर देखील याच कारागृहात पाहुणचार घेत आहेत. त्यामुळे अनेक वेळा नाशिकरोड कारागृह वेगळ्या अर्थाने चर्चिले गेले आहे. या कारागृहात ओ.पी. सिंगसारख्या सराईत गुन्हेगाराचा खून करण्याची घटना घडली, त्याचबरोबर गुन्हेगारी टोळ्यांनी एकमेकांचा काटा काढण्यासाठी देखील कारागृहाचा वापर केल्याच्या घटना घडल्या आहेत. साधारणत: तरुणाई गुन्हेगारी कृत्याकडे वळाल्याचे कारागृहातील कैद्यांच्या संख्येवरून लक्षात येत असून, त्यातही अमलीपदार्थांची तस्करी, सेवनाकडे तरुणांचा अधिक कल असल्याचे जाणवते. भाईगिरी व गुन्हेगारी टोळ्यांमधील वैमनस्यातून झालेले अपराध त्याचबरोबर व्यक्तिगत कारणातून एकमेकांचा काटा काढण्याच्या प्रकारातही अलीकडे वाढ झाल्याचा परिणाम कैद्यांच्या संख्येवर होत आहे. महिला, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ व त्याबाबतच्या खटल्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्ह्यातील नराधमही सध्या शिक्षा भोगत आहेत. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची संख्याही नाशिकरोडच्या कारागृहात कमी नसून, महिला कैदीही शिक्षा भोगत आहेत.
नाशिकरोड कारागृहात शिक्षाबंदी व न्यायबंदी म्हणजे कच्चे कैदी असे दोन्ही प्रकारचे कैदी आहेत. न्यायबंदी कैद्यांच्या प्रकरणांची न्यायालयात सुनावणी होणे बाकी आहे तर शिक्षाबंदी म्हणजे न्यायालयाने त्यांच्यावरील अपराधाची शिक्षा सुनावलेली आहे. अशा न्यायबंदी कैद्यांमध्ये देखील तरुणांची संख्या अधिक असल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
---
पॅरोलवरील १ कैदी रजेवर
दीर्घ मुदतीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यास कायद्यानेच काही दिवस पॅरोलवर सोडण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी पुरेसे समाधानकारक कारण असावे. न्यायालय व कारागृह प्रशासनाची कैद्याची पॅरोलवर सोडण्यासाठी अनुमती असणे महत्त्वाचे असून, साधारणत: आजारपण, कुटुंबातील लग्नसोहळा, दु:खद प्रसंगात पॅरोलवर कैद्याला सोडले जाते.
---------
७४ महिला कैदी कारागृहात
नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात महिला कैद्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून, सध्या या ठिकाणी ७४ महिला कैदी शिक्षा भोगत आहेत. यातील अपवादात्मक कैदी गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्या आहेत, अन्य कैदी मात्र कळत नकळत हातून झालेल्या गुन्हेगारी कृत्यामुळे कारागृहात बंदिस्त झाल्या आहेत.
---------
खुनाच्या गुन्ह्यातील सर्वाधिक कैदी
कारागृहात प्रामुख्याने खून, हत्येच्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यात राज्यातील अन्य जिल्ह्यांतील वा कारागृहातील कैद्यांचाही समावेश आहे. प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढणे व वर्चस्व मोडीत काढण्याच्या गुन्ह्यात झालेली वाढ हेच यामागचे कारण आहे.
------
पैसा, मौजमस्ती हेच प्रमुख कारण
* बदललेली जीवनशैली, लहानपणापासून वाईट संगतीचा झालेला परिणाम गुन्हेगारी कृत्यास कारणीभूत
* भाईगिरी, वर्चस्ववाद गाजविण्याची तरुणाईत असलेली नशा व त्यातून गुन्हे करण्यास वाढलेले धाडस देखील महत्त्वाचे ठरले आहे.
* झटपट श्रीमंत होण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी, अमलीपदार्थांची लागलेली चटक व त्यामुळे ऐन तारुण्यात गुन्हेगारी कृत्याकडे पाऊल पडल्याचा परिणाम आहे.