नाशिक (सुयोग जोशी) : कोलकाता येथील कोलकाता येथे पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीची ड्युटीवर असताना बलात्कार करून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचार विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांनी मूकमोर्चा काढून बंद पाळला. अत्यावश्यक सुविधा मात्र देण्यात आली.
९ ऑगस्ट २०२४ रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीची ड्यूटीवर असताना बलात्कार करून हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले होते. नाशिकच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयएमए हाऊस ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ५०० हून अधिक डॉक्टर्स तसेच नाशिकरोड आयएमए, एफपीए, निमा, आयडीए, होमिओपॅथी डॉक्टर्स, न्यू निमा अशा अनेक वैद्यकीय संघटना सहभागी झाल्या होत्या.
मोर्चाचे रूपांतर हुतात्मा स्मारक येथील सभेत झाले. आयएमचे अध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी सभेला संबोधित केले. त्यानंतर प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रविराज खैरनार, डॉ. नीलेश निकम, डॉ. अनिरूद्ध भांडारकर, डॉ. राजेंद्र नेहते, डॉ. नहाटा, डॉ. सारंग दराडे, डॉ. रमेश घाडगे आदिंनी परिश्रम घेतले. या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचार विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवल्या आहेत. अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील. कृपया सर्व रुग्णांनी ह्याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.